पुणे : पुण्यातील काम सोडून गावाकडील शेती आणि जनावरे सांभाळण्याचे काम करावे लागणार असल्याच्या रागातून एकाने आपला सावत्र भाऊ आणि भावजयीवर चाकूहल्ला करीत डोक्यात लोखंडी डंबेल्स घातल्याने भावजय जागीच ठार झाली; तर भाऊ गंभीर जखमी झाला.
या हल्ल्यानंतर दुचाकीवरून पळून जाणारा हल्लेखोरही मोटारीला धडकून मरण पावला. आंबळे (ता. शिरूर) येथे आज पहाटे चार ते पाचच्या दरम्यान हा थरार घडला.
अनिल बाळासाहेब बेंद्रे (वय २५) असे मृत झालेल्या हल्लेखोराचे नाव आहे. त्याने केलेल्या हल्ल्यात प्रियांका सुनील बेंद्रे (वय २८) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील बाळासाहेब बेंद्रे (वय ३०) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी हे तिघेही उच्चशिक्षित असून, या घटनेने आंबळे परिसरात खळबळ उडाली आहे. बाळासाहेब पोपट बेंद्रे (रा. अंब्याचा मळा, आंबळे, ता. शिरूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मृत अनिल बेंद्रे आणि जखमी सुनील बेंद्रे हे सावत्र भाऊ असून, दोघेही पुण्यात नोकरीस होते व तेथेच वास्तव्यास होते. पदवीधर असलेला अनिल हा खासगी कंपनीत नोकरीस होता. तर सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला सुनीलही खासगी कंपनीत नोकरीस होता. दारूचे व्यसन असलेला अनिल हा कुठल्याही एका कंपनीत टिकून काम करीत नसल्याने त्याला गावाकडे आणून शेती करायला द्यावी किंवा गोपालनाचा व्यवसाय सुरू करून द्यावा, असे सुनील यांनी सांगितल्याने फिर्यादी बाळासाहेब बेंद्रे यांनी त्याला १५ एप्रिल रोजी गावी आंबळे येथे आणले होते.



