पुणे : राज्यातील कारागृहांमध्ये शिक्षा भोगणाऱ्या चार हजार कैद्यांना करोनाकाळात आपत्कालीन अभिवचन रजेवर अर्थात ‘पॅरोल’वर सोडण्यात आले होते. संसर्ग कमी झाल्यानंतर त्यांना कारागृहात परतण्याचा आदेशही देण्यात आला होता. मात्र, ४०६ कैदी अद्याप परत आले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फरारी कैद्यांच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यात मध्यवर्ती, जिल्हा, खुले आणि महिला अशी एकूण ६० कारागृहे आहेत. या कारागृहांची क्षमता २५ हजार ३९३ कैद्यांची आहे. प्रत्यक्षात मात्र, या कारागृहांमध्ये ४० हजार ९०५ कैदी ठेवण्यात आले आहेत. करोनाकाळातही कारागृहे ‘ओव्हरफ्लो’ झाली होती. कारागृहात संसर्ग वाढू नये, म्हणून शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना आपत्कालीन पॅरोलवर सोडण्याच्या सूचना कारागृह प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कारागृह प्रशासनाने राज्यातील विविध कारागृहांतील चार हजार २०० पेक्षा जास्त कैद्यांना आपत्कालीन पॅरोलवर सोडले. त्यामध्ये जन्मठेपेबरोबरच सात वर्षांपर्यंत शिक्षा असलेल्या कैद्यांचा समावेश होता.




