
पणजी : भारताची रशियाला होणारी निर्यात घटली असताना आयात मात्र पाच पटींनी वाढली आहे. यापैकी बहुतांश व्यवहार भारतीय चलनात झाला असून हे अब्जावधी रुपये रशियाच्या भारतीय बँकांमधील खात्यात जमा आहे. भारतीय चलनातील या रुपयांचा रशियाला थेट वापर करता येणार नसल्याने त्याचे करायचे काय, अशी चिंता रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी व्यक्त केली आहे.
लाव्हरोव्ह हे शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी गोव्यात आले असून त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधत या मुद्द्यावरून चिंता व्यक्त केली. लाव्हरोव्ह म्हणाले,‘‘भारतीय बँकांमध्ये आमचे अब्जावधी रुपये जमा आहेत. ही एक समस्याच निर्माण झाली आहे. आम्हाला हा पैसा वापरायचा आहे, मात्र त्यासाठी त्याचे दुसऱ्या चलनात रुपांतर करणे आवश्यक आहे.




