
आंबेगाव येथील नारोडी येथे महिला पत्रकारास धमकी दिलेल्या घटनेचा आळंदीमध्ये आळंदी पत्रकार बांधवांनी जाहीर निषेध व्यक्त केला. नारोडी येथील रस्त्याच्या समस्येवर वृत्तांकन केल्यामुळे समर्थ भारत माध्यम समुहाच्या संपादिका स्नेहा बारवे यांना संबंधित गुंड प्रवृत्तीचे लोकांनी धमकी दिली.
या घटनेचा आळंदी परिसरातील पत्रकार बांधवांनी जाहीर निषेध व्यक्त करत, त्यांनी आळंदी पोलीस स्टेशनला त्या संदर्भात निवेदन दिले. स्नेहा बारवे यांना धमकी दिल्याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश पाटील, आर.सी.गायकवाड व मच्छिंद्र शेंडे यांना ते निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार भानुदास पऱ्हाड, अर्जुन मेदनकर, दिनेश कुऱ्हाडे, विठ्ठल शिंदे, सुनील बटवाल, बी.एन.घुगे, आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. याबाबत माहिती किरण नरके यांनी दिली.




