पुणे : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून २०२३ या वर्षांसाठी उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्रिपदकां’ची यादी जाहीर झाली; परंतु यादीत महाराष्ट्राला एकही पदक प्राप्त झाले नसल्याची बाब समोर आली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा, विविध राज्यांतील पोलिसांना तपासात उत्कृष्टतेसाठी केंद्रीय गृहमंत्रिपदक दिले जाते. तपास अधिकाऱ्यांच्या गुणवत्तेस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुरस्काराची सुरुवात केली होती. यंदा २०२३ वर्षासाठी देशातील १४० पोलिस अधिकारी- कर्मचान्यांना उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्रिपदक’ प्रदान करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) १५, राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) १२, उत्तर प्रदेशातील दहा, केरळ आणि राजस्थान राज्यातील प्रत्येकी नऊ, तमिळनाडूचे आठ, मध्य प्रदेशचे सात आणि गुजरात राज्यातील सहा जणांचा समावेश आहे. याशिवाय इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील अधिकारी आहेत. यादीत महाराष्ट्र पोलिस दलातील एकाही अधिकारी- कर्मचाऱ्यांना स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार तांत्रिक दोषामुळे घडला की इतर काही कारण असावे, याबाबत पोलिस दलात तर्क-वितर्क लढविले जात आहेत.




