नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर लडाखमधील देस्पांगच्या मैदानी प्रदेशात पूर्वेला साठ किलोमीटर अंतरावर चिनी लष्कराने बोगदे खोदायला सुरूवात केली असून अरुंद नदीच्या खोऱ्यामध्ये सैनिक आणि शस्त्र सामग्रीसाठी निवारा केंद्रे आणि बंकरची उभारणी केली जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ज्या भागामध्ये चीनच्या या सगळ्या कुरापती सुरू आहेत तो भाग प्रत्यक्ष ताबा रेषेच्या पूर्वेला अक्साई चीनमध्ये आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने ‘मॅक्सार’कडून याबाबतची छायाचित्र मिळविली असून आंतरराष्ट्रीय ‘जिओ- इंटेलिजन्स’च्या तज्ज्ञांनी त्यांचे विश्लेषण केले आहे. येथील नदीच्या दोन्ही बाजूच्या किनाऱ्यावर असलेल्या खडकाळ भागामध्ये ११ पेक्षाही अधिक बोगदे खोदण्यात आल्याचे दिसून आले आहे. मागील काही महिन्यांपासून या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. भारतीय लष्कराला शह देण्यासाठी चीन आपली ताकद वाढवीत असल्याची चर्चा आहे. तत्पूर्वी चीनने प्रसिद्ध केलेल्या नव्या नकाशात अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा समावेश करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला होता. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मात्र चीनचा हा दावा खोडून काढला होता. चीनची ही जुनी खोड असून त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही, असे त्यांनी म्हटले होते.
चीनकडून नकाशाचे समर्थन
चीन सरकारने अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनवर दावा करणारा नवा नकाशा प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली होती. आता या नकाशाचे चीनकडून समर्थन करण्यात आले असून कायद्याच्या चौकटीतील ही नेहमीच प्रक्रिया असून भारताने त्याकडे शांत आणि वस्तुनिष्ठपणे पाहावे तसेच या मुद्द्याचा फारसा बाऊ करू नये, असे म्हटले आहे.




