पुणे : महापालिकेने शहरातील प्रामाणिक मिळकतकर दात्यांसाठी काढलेल्या ‘लकी ‘ड्रॉ’ मधील भाग्यवंत विजेत्यांसाठी बक्षीस म्हणून कार व स्कूटर खरेदी करण्यास पालिकेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. आता निविदा न मागवता आयुक्तांच्या अधिकाराअंतर्गत वाहनांची थेट खरेदी करून विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत.
प्रामाणिक करदात्यांसाठी २० ऑगस्ट रोजी ‘लकी ड्रॉ’ काढून पालिकेने विजेत्यांची घोषणा केली. या योजनेंतर्गत भाग्यवंत मिळकतधारकांना पाच पेट्रोल कार, १५ ई -बाईक, १५ मोबाइल फोन, १० लॅपटॉप अशी एकूण ४५ बक्षिसे जाहीर करण्यात आली. ‘लकी ड्रॉ’ जाहीर झाला तरीही बक्षिसे खरेदीची निविदाप्रक्रियाच अद्याप पूर्ण झाली नसल्याचे समोर आले होते. ही खरेदी निविदाप्रक्रियेतच अडकल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. हा प्रस्ताव मोटरवाहन विभागाकडून अतिरिक्त आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने २० ऑगस्ट रोजी लॉटरी काढली होती. त्यापोटी येणाऱ्या खर्चासही आयुक्तांनी मे महिन्यातच मान्यता दिली होती. मात्र, या प्रक्रियेला विलंब झाला. आता महापालिकेने खुल्या बाजारातून दरपत्रक (कोटेशन) मागवून वाहन खरेदी करण्याचे निश्चित केले आहे, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.



