नवी दिल्ली : कच्च्या कोकिंग कोळशाचे उत्पादन २०३० सालापर्यंत १४० दशलक्ष टनांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. पोलाद उत्पादनासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोकिंग कोळशाची उपलब्धता वाढली असून, पोलाद उत्पादनाच्या पाठबळावर झालेल्या औद्योगिक विकासाची गती कायम राखण्यासाठी ती महत्वाची आहे.
देशांतर्गत कोकिंग कोळशाची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी पोलाद आणि कोळसा मंत्रालयाने केलेल्या एकत्रित प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
राष्ट्रीय पोलाद धोरण २०१७ मध्ये केलेल्या तरतुदीनुसार, देशाची कोकिंग कोळशाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कोळसा मंत्रालयाने मिशन कोकिंग कोलसुरु केले होते.
आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत परिवर्तनात्मक उपायांच्या मदतीने, कोकिंग कोळशाची आयात लक्षणीयरित्या कमी करणे ही या मिशनची संकल्पना आहे. संशोधन, उत्पादन वाढ, तंत्रज्ञानाचा अवलंब, कोकिंग कोल ब्लॉक्समध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग, नवीन वॉशराजची स्थापना, संशोधन आणि विकास उपक्रमात वाढ आणि गुणवत्ता वाढ, या उपायांचा यात समावेश आहे.




