नवी दिल्ली (प्रतिनिधी) भाजपनंतर काँग्रेसनेही आपल्या खासदारांना व्हीप जारी केल्यामुळे संसदेचे विशेष अधिवेशन वादळी होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने बोलाविलेले हे पहिलेच विशेष अधिवेशन होय, हे येथे उल्लेखनीय.
सविस्तर वृत्त असे की, सोमवार दि. १८ सप्टेबरपासून सुरू होणारे संसदेचे विशेष अधिवेशन गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप आणि मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने आपल्या खासदारांना व्हीप जारी करून सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या विशेष अधिवेशनात बेरोजगारी, महागाईं, अदानी प्रकरण यासारख्या काही मुद्यांवर चर्चा करण्याची मागणी केली आहे. सरकारने विशेष अधिवेशनाची घोषणा करताना अजेंडा जाहीर केला नाही. यामुळे अधिवेशनात कोणत्या गोष्टींवर चर्चा करायची याची आपण यादी देत असल्याचे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोनिया गांधी यांच्या पत्राला प्रत्यूत्तर देत खरपूस समाचार घेतला होता. आपण राजकारण करीत आहात असा आरोप जोशी यांनी केला होता. यानंतर भाजप आणि काँग्रेसने व्हीप जारी केला आहे. यामुळे अधिवेशन हंगामेदार होणार अशी चर्चा आहे.
सरकारनुसार, या अधिवेशनात संसदेच्या ७५ वर्षांतील कामगिरी, अनुभव, काही आठवणी आणि त्यापासून आपण काय शिकलो आदी मुद्यावर चर्चा केली जाणार आहे. याशिवाय सरकार चार विधेयकही मांडणार आहे. यात अधिवक्ता (सुधारणा) विधेयक, २०२३ आणि प्रेस आणि बुक नोंदणी विधेयक, २०२३ यांचा समावेश आहे.
जे राज्यसभेने मंजूर केले असून लोकसभेत प्रलंबित आहेत. पोस्ट ऑफिस बिल २०२३ आणि मुख्य निवडणूक आयुक्त, इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, सेवा शर्ती विधेयक २०२३ चा समावेश आहे.




