बारामुल्ला : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग भागात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीनंतर बारामुल्लामध्येही चकमक सुरू झाली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी, हातलंगा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांची शोध मोहीम अजूनही सुरू असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी बारामुल्लामध्ये सुरू असलेल्या चकमकीची माहिती सोशल मीडिया साइट एक्सवर (ट्रिटर) दिली आहे. लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून तेथे लपलेल्या इतर दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. सुरक्षा दलांना उरी आणि हातलंगा या भागात आणखी काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दल आणि पोलीस संयुक्त कारवाई करत आहेत. Iदरम्यान, बारामुल्लामध्ये शुक्रवारी लष्कर-ए- तैयबाच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करताना दहशतवाद्यांच्या दोन मदतनीसांना अटक करण्यात आली होती.
- अनंतनागमध्ये मोहीम सुरूच
अनंतनाग जिल्ह्यात डोंगराळ भागामध्ये मोक्याची जागा हेरून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम शनिवारीही सुरू राहिली. या दहशतवाद्यांचा माग घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात असून सुरक्षा दलांनी उखळी तोफांचाही मारा केला. या दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत बुधवारी कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष घोंचाक, अन्य एक जवान आणि जम्मू व काश्मीरचे उपअधीक्षक हुमायूँ भट शहीद झाले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रोनद्वारे टेहेळणी करून दहशतवादी लपलेल्या जागेचा अंदाज घेण्यात आला आणि त्यानुसार उखळी तोफांचा मारा करण्यात आला. या भागात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.




