नवी दिल्ली पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाचे विशेष अतिथी म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रण दिले आहे. दिल्लीत झालेल्या ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान हे निमंत्रण बायडेन यांना देण्यात आले आहे. अमेरिकेचे भरतातील राजदूर एरिक गार्सेटी यांनी आज ही माहिती दिली.
बायडेन यांच्या भारत ‘भेटीदरम्यानच ‘क्वॉड’ परिषद आयोजित केली जाणार आहे का असे विचारल्यावर गार्सेटी यांनी ‘आपल्याला माहिती नाही. असे उत्तर दिले. ‘क्वाड’ गटामध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. पुढील वर्षी वार्षिक ‘क्वाड’ परिषद भारतात आयोजित केली जाणार आहे. ही परिषद आळीपाळीने प्रत्येक सदस्य देशामध्ये आयोजित केली जाते. या ‘क्वॉड’ परिषदेतील सदस्य देशांच्या प्रमुख नेत्यांना प्रजासत्ताकदिनाच्या समारंभाला निमंत्रित करण्याचा भारताकडून विचार सुरू आहे.
याबद्दलही गार्सेटी यांना विचारण्यात आले. त्यावर पंतप्रधान मोदींनी “जी-२०’ परिषदेच्यावेळीच बायडेन यांना प्रजासत्ताकदिनासाठीचे निमंत्रण दिले आहे, असे गार्सेटी म्हणाले.
इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी हे यावर्षीच्या प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. मात्र कोविड- १९ च्या साथीच्या पार्श्वभूमीवर २०२१ आणि २०२२ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला कोणीही प्रमुख पाहुणे नव्हते.




