मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक १% पेक्षा जास्त कोसळले. परकीय गुंतवणूकदारानी शेअर बाजारात विक्री चालूच ठेवली आहे. अशा परिस्थितीत रुपयाचे मूल्य कोसळत होते. मात्र रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप केल्यामुळे आज रुपयाच्या मूल्यात तब्बल २४ पैशांची सुधारणा होऊन रुपयाचा भाव ८३.०८ रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला होता.
दरम्यान कच्च्या तेलात गुंतवणूक करणाऱ्या काही गुंतवणूकदारांनी नफा काढून घेण्यासाठी बरीच विक्री केले असल्यामुळे कच्च्या तेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले होते. याचाही रुपयाचे मूल्य सुधारण्यास मदत झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र चलन व्यापाऱ्यांचे लक्ष लवकरच जाहीर होणाऱ्या अमेरिकेच्या पतधोरणाकडे आहे. तेल उत्पादक देशांनी डिसेंबर महिन्यापर्यंत तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचे जाहीर केल्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत..
यामुळे जागतिक पातळीवर महागाई वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अमेरीकेची रिझव्हं बँक व्याजदरात कधी आणि किती वाढ करते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. अमेरिका तेल उत्पादक देशावर तेल उत्पादनात वाढ करण्यासाठी दबाव आणण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.
मात्र तूर्त महागाई रोखण्यास प्राधान्यक्रम देणाऱ्या अमेरिकेच्या रिझव्हं बँकेला व्याजदरात वाढ करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे समजले जात आहे. या कारणामुळे आज अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा मोठ्या प्रमाणात वाढला होता. दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँक रुपयाचे मूल्य सध्याच्या पातळीवर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करेल.




