राजगुरुनगर : भातुकलीच्या खेळापासून संसार असो की राजकारण भावाकडून बहिणीची पाठराखण करण्याची अनेक उदाहरणे आहेत. गावकारभाराच्या चाव्या हाती घेतलेल्या बहिणीची राजकीय पाठराखण करण्यासाठी असाच एक भाऊ उपसरपंच झाल्याचे उदाहरण खेड तालुक्यातील तुकाईवाडी गावात घडले आहे.
सख्खे बहीण-भाऊ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत. कुसुम संदीप भांबुरे सरपंच, तर संपत रामदास थिगळे हे नवनिर्वाचित उपसरपंच भावाचे नाव आहे. अतुट प्रेमाचे बंधन असे सामजिक प्रतीक असलेल्या बहीण-भावाच्या नात्याला राजकीय झालर देणाऱ्या या निवडीची चर्चा तालुकाभर होत आहे.
तुकाईवाडी (ता. खेड) ग्रामपंचायतीत मावळते उपसरपंच साहेबराव गाढवे यांनी पदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच कुसुम भांबुरे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेविका लता ठुबे यांच्या कामकाज माध्यमातून बुधवारी (दि. २०) निवड प्रक्रिया झाली. त्यामध्ये ग्रामस्थांनी एकविचाराने निर्णय घेतला. संपत थिगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत सदस्य साहेबराव गाढवे, रेश्मा कोरडे, सुवर्णा दरेकर या वेळी सभागृहात उपस्थित होते. संपत थिगळे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ती व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष करणसिंह सांडभोर, उपाध्यक्ष रविराज कोरडे, वरची भांबुरवाडीचे सरपंच विजय थिगळे, माजी सरपंच देवराम थिगळे, विवेक सुर्वे, साहेबराव थिगळे, कुंडलिक थिगळे व ग्रामस्थांनी उपसरपंच संपत थिगळे यांचा सन्मान केला.




