कोट्टायम : केरळच्या कोट्टायममध्ये २४ सप्टेंबरच्या रात्री पोलीस छापा टाकण्यासाठी एका संशयित ड्रग तस्कराच्या घरी पोहोचले होते. पोलीस घरात शिरताच अनेक मोकाट कुत्र्यांनी टीमवर हल्ला केला. पथकाने कुत्र्यांना ताब्यात घेतले, तोपर्यंत घरात उपस्थित असलेले लोक पळून गेले. या कुत्र्यांना खाकी रंगाचे कपडे घातलेल्या लोकांवर हल्ला करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते, जेणेकरून ड्रग्ज माफियांना तेथून पळून जाण्याची संधी मिळेल, असे उघड झाले आहे.
तमिळनाडू पोलिसांनी याच ड्रग्ज तस्कर रॉबिन (२९) याला गुरुवारी रात्री तिरुनेलवेली येथील त्याच्या लपून बसलेल्या ठिकाणाहून अटक केली आहे. त्याला अधिक चौकशीसाठी केरळला आणण्यात आले आहे. छापेमारीत १३ कुत्रे तेथे आढळले. यापैकी बहुतेक पिटबुल आणि रॉटवेलर प्रजातीचे होते. काही वेळाने पोलिसांनी कुत्र्यांना ताब्यात घेतले. तसेच रॉबिनच्या घरातून १७ किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला आहे. छापेमारीपूर्वी तिथे इतके हिंसक कुत्रे असतील याची त्यांना अपेक्षा नव्हती.




