नवी दिल्ली ; जगभरात हवामान बदलाच्या वाढत्या घटना पाहता, जसजसे जागतिक तापमान वाढेल, तसतसा पृथ्वीवर दमटपणा वाढेल. त्यामुळे जमिनीची अवस्था ही प्रेशर कुकरसारखी होईल, असा धक्कादायक दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
वॉशिंगटनच्या नॉर्थ वेस्ट युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार पृथ्वीच्या तापमानात १ डिग्री सेल्सिअसने वाढ होणार असून, त्याबरोबरच हवेतील दमटपणा ७ टक्क्यांनी वाढणार आहे. परिणामी हीट इंडेक्समध्ये खूप वाढ होणार आहे. अर्थ फ्युचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात हवेतील आर्द्रता वाढण्याचा दुष्परिणाम हा महापूर आणि वादळाच्या रुपात समोर येण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे.
वैज्ञानिक हायजियांग वू यांनी अहवालात म्हटले आहे की, महापूर, अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याचे प्रकार वाढतील. हीट वेवमुळे जमिनीचा वरचा थर कोरडा पडेल. यामुळे पावसाळ्यात पाणी जमिनीत मुरण्याऐवजी समुद्रात पोहचते. जीवाश्मातून तयार होणाऱ्या इंधनामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढते तसेच अलनीनोमुळे असे वाटते की पृथ्वी कोणत्या तरी अनोळखी वातावरणात सापडली आहे. या वर्षी जुलैत आतापर्यंतचा सर्वाधिक तापमान असलेला दिवस होता. जागतिक स्तरावर जून सर्वाधिक उष्णतेचा महिना होता. त्याचवेळी अंटार्टिक समुद्रात बर्फ खूप कमी प्रमाणात तयार झाले, अशी माहिती लंडनच्या इंम्पिरियल कॉलेजचे जलवायू विज्ञानाचे प्राध्यापक डॉ. पाओलो सेप्पी यांनी दिली.
भारताला अधिक फटका…
तापमानात सारखी होणारी वाढ आणि समुद्रसपाटीचा भाग उष्ण होणे आणि अंटार्टिक महासागरातील बर्फ वितळण्याच्या घटना पाहता काही भयंकर उत्पात होण्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे सर्वांत जास्त फटका याचा भारताला बसला आहे आणि भविष्यात बसणारही आहे. भारतातील एका भागात या वर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस पडला आहे. तर देशाच्या ४० टक्के भागाला महापूर आणि पावसाने झोडपले. तर, इतर भागात अजिबात पाऊस नाही.




