नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी – यांनी केलेल्या टीकेचा आधार घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत राष्ट्र समितीला (वीआरएस) नवे नाव दिले. त्यांनी भाजप रिश्तेदार समिती असे बीआरएसचे नामकरण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंगळवारी तेलंगणात सभा झाली. त्यावेळी त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यावर निशाणा साधला. केसीआर यांची भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत (एनडीए) सहभागी होण्याची इच्छा होती. मात्र, केसीआर यांच्या कृत्यांचा विचार करून मी त्यांची विनंती फेटाळली, असा दावा मोदींनी केला. अर्थात, तो दावा खोटा असल्याचा प्रतिदावा बीआरएसने केला. मात्र, राहुल यांनी बीआरएस आणि भाजप या दोन्ही पक्षांना लक्ष्य करण्याची संधी साधली.
मी जे म्हणत होतो; त्याची जाहीर कबुली मोदींनी दिली. बीआरएस म्हणजे भाजप रिश्तेदार समिती. भाजप बीआरएस भागीदारीने मागील दहा वर्षांत तेलंगणाला उद्ध्वस्त केले. त्यांचा खेळ सुज्ञ जनतेने ओळखला आहे. यावेळी त्या दोन्ही पक्षांना नाकारून जनता काँग्रेसला सत्तेत आणेल, अशी प्रतिक्रिया राहुल यांनी सोशल मीडियावरून दिली. तेलंगणात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत होईल.




