पुणे : पुणे रेल्वे विभागात ऑक्टोबरमध्ये विनातिकीट प्रवास करणारे, अनियमित तिकीट काढणारे व सामान बुक न करता प्रवास करणाऱ्या एकूण ३४ हजार ३९ प्रवाशांवर रेल्वेने कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे दोन कोटी ६६ लाखांचा दंड वसूल केला. यामध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या २३ हजार १४५ एवढी आहे. त्यांच्याकडून दोन कोटी तीन लाखांचा दंड वसूल केल्याचे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी सांगितले.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेशकुमार सिंह व वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या सूचनेवरून कारवाई करण्यात आली. पुणे विभागातील विविध स्थानकांवर, गाड्यांमध्ये तिकीट निरीक्षकांनी कारवाई केली आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांची मदत घेण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारची तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू असते. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




