शिरुर : लोकसभेचे वारे वाहत असताना राज्यातील सत्तेमध्ये असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरूवात झाली असल्याचे दिसून येत आहे. अजित पवारांनी शिरूर लोकसभेवर दावा केला आहे. तर शिरूरमधून शिवाजीराव आढळरावांना संधी मिळेल असं वक्तव्य शिंदेंनी केलंय. यामुळे शिरूर लोकसभेवरून शिंदे-अजित पवारांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांनी शिरूरवर दावा केल्यानंतर शिंदेंनी शिरूरमध्ये सभा घेत शक्तिप्रदर्शन केलं. तर त्याचाच दुसऱ्या दिवशी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेतला.
यावेळी ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसमय कसा आहे हे दाखवून द्या असे आदेश दिलेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार यांचा सुप्त संघर्ष सुरु आहे का? अशी चर्चा सुरू झाली.




