गुवाहाटी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) पुढील तपास करेल. राहुल यांना लोकसभा निवडणुकीनंतर अटक होईल, अशी स्पष्टोक्ती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी बुधवारी केली. राहुल यांच्या नेतृत्वाखाली सध्या भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. त्या यात्रेला मंगळवारी भाजपशासित आसाममधील गुवाहाटीत रोखण्यात आले.
त्यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली. कार्यकर्त्यांनी पोलिसांना न जुमानता बॅरिकेड्स हटवून पुढे कूच करण्याचा प्रयत्न केला. त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. त्यानंतर पोलिसांनी राहुल आणि काँग्रेसच्या इतर काही नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला. हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर, सर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना राहुल यांना पुढील काळात अटक होण्याचे सूतोवाच केले. यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भाजप धास्तावला आहे.




