पुणे : दुचाकीस्वार वाहनचालकांनी हेल्मेट परिधान करणे कायद्याने अनिवार्य आहे. परंतु प्रथम हेल्मेटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, चर्चा केल्यानंतरच हेल्मेट सक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल असं पुण्याच्या नवीन आयुक्तांनी म्हटलं आहे.
त्यामध्ये नागरिकांचा प्रतिसाद पाहून आणि संबंधित घटकांशी चर्चा केल्यानंतरच हेल्मेट सक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
पोलिस आयुक्त कार्यालयात बुधवारी (ता. ७) सायंकाळी ते पत्रकारांशी बोलत होते. अमितेश कुमार म्हणाले, पुणे शहरात वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. नागरिकांना वाहतूक कोंडीत बराच वेळ अडकून पडावे लागते. त्यामुळे ही समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख दहा ते बारा चौक आणि रस्ते (हॉटस्पॉट) निश्चित करण्यात आले आहेत. महापालिका आणि संबंधित एजन्सींसमवेत चर्चा करून तेक्षील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचे लगेचच परिणाम दिसून येतील असे नाही. परंतु त्यासाठी संबंधित एजन्सीबाबत चर्चा सुरू केली आहे.




