वालचंदनगर – येत्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य साखरसंघाचे व श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही भेट असली तरी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचा रागरंग या भेटीने बदलणार आहे. छत्रपती’ला पवार-जाचक प्रयोग झाल्यास ‘माळेगाव’ व ‘सोमेश्वर’ मध्येही आजपर्यंतची सूत्रे बदलण्याची शक्यता असल्याने या भेटीकडे जिल्ह्यातील साखरपट्ट्याचे डोळे लागले आहेत.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामधील फुटीनंतर पवार कुंटूबामध्ये दोन गट पडले आहेत. इंदापूर तालुक्याचे आमदार अजित पवार गटाचे असले तरी शरद पवार यांनाही मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. आणि खासदार म्हणून सुप्रिया सुळे यांचाही इंदापूर तालुक्यात दांडगा संपर्क आहेच.
विशेषतः छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये शरद पवार यांच्या विचाराशी सहमत असणारा मोठ्या प्रमाणात सभासद वर्ग आहे. शेतकऱ्यांच्या त्यांच्यावर विश्वासही आहे. महायुतीतर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
या पार्श्वभूमीवर आव्हान निर्माण झाल्याने सुळे यांची निवडणूक सुकर व्हावी यासाठी शरद पवार यांनी ही जुन्या सहकाऱ्यांना बोलविण्यास सुरवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पाश् र्वभूमीवर पवार -जाचक यांची भेट महत्वाची मानली जाते. एकीकडे शरद पवार यांची ताकद आणि दुसरीकडे इंदापूर तालुक्यामध्ये जाचक यांना मानणारा मतदार वर्ग असून याचा परीणाम निश्चित लोकसभेच्या निवडणूकीवर होवू शकतो.
यापेक्षा चर्चेची बाब म्हणजे जाचक यांच्यासाठी छत्रपती कारखान्याची निवडणूक अधिक महत्वाची आहे. छत्रपती कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक गेल्या चार वर्षापासुन रखडली आहे. छत्रपतीच्या निवडणूकीमध्ये शरद पवार व जाचक गट एकत्र आल्यास वेगळे चित्र पहावयास मिळणार असून पवार-जाचक यांचे पारडे जड होवू शकते.
शिवाय पाठोपाठ माळेगावची आणि अडीच वर्षांनी सोमेश्वरची निवडणूक येऊ घातली आहे. तिथेही छत्रपती पॅटर्न येऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. म्हणूनच पवार-जाचक भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. यापूर्वीही शरद पवार -जाचक यांच्यामध्ये छत्रपती कारखान्याच्या संदर्भात डिनर डिप्लोमसी झाली होती.




