पुणे : अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांनी पूर्वीचा एक किस्सा सांगताना पक्षात तेव्हाच फूट पडली असती असं म्हटलं आहे. तसेच बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरही त्यांनी भाष्य केलं आहे.
माध्यमांशी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले, “शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अजित पवार राजकीय क्षेत्रात आले. त्यानंतर राजकारणात त्यांनी सक्रीयपणे भाग घ्यायला सुरुवात केली. याकाळात मी दोन वेळा छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत आपल्याला रस असल्याचं म्हटलं होतं. पण शरद पवारांनी दोन्ही वेळेला मला या क्षेत्रात न येण्याचा आदेश दिला. हा आदेश दोन्ही वेळेला मी पाळला. पण मला वाटतं की हा जरी राजकीय निर्णय असला तरी शरद पवारांना राजकारण जास्त कळतं. त्या काळात मी जर राजकीय क्षेत्रात आलो असतो तर याची सुरुवात त्याचवेळी झाली असती. पण जे काही झालेलं आहे ते चांगलं झालेलं आहे.




