इस्त्राइल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशातच लेबनॉनवर इस्राइलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांनी काल (मंगळवारी) सकाळी उत्तर इस्राइलच्या दिशेने जवळपास 100 रॉकेट डागले. इस्रायली सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
इस्राइल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) च्या म्हणण्यानुसार, लेबनीज हिजबुल्लाह अतिरेक्यांनी अप्पर गॅलीली प्रदेश आणि इस्राइलच्या ताब्यात असलेल्या गोलान हाइट्सवर क्षेपणास्त्र डागले आहेत. देशाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने काही क्षेपणास्त्र हवेतच पाडले. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याची तात्काळ माहिती मिळालेली नाही.
आयडीएफने एका निवेदनात पुष्टी केली की, हिजबुल्लाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्या युद्धविमानांनी सकाळी क्षेपणास्त्र फायर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन प्रक्षेपकांवर हल्ला केला.
लेबनीज राजधानी बेरूतपासून सुमारे 45 किमी पूर्वेला असलेल्या बेका खोऱ्यात इस्रायली हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लाने हे हल्ले केले. इस्राइलच्या सीमेपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेली बेका व्हॅली हिजबुल्लाचा गड मानली जाते.




