मुंबई – देशात लोकसभा निवडणुकीचे रण पेटले असून सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. दुसरीकडे राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीमुळे मविआ आणि महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. महायुतीतील जागावाटपावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. जागावाटपाबाबत अद्याप महायुतीत खलबते सुरू असल्याचे दिसून येत आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुन्हा जागावाटपासाठी दिल्ली दरबारी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या बैठकीत महायुतीच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होणार आहे. यात महायुतीच्या घटकपक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्याशी बैठक होईल. या बैठकीत महायुतीतील जागावाटपावर चर्चा करून शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.
या चर्चेसाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत. शिवाय, मुख्यमंत्री आणि अजित पवार आज रात्री दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेच्या जागांच्या अनुषंगाने आज अंतिम चर्चा पार पडणार असल्याची माहिती आहे.




