पुणे ; आपचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज ( दि. १ एप्रिल) दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी २१ मार्च रोजी ईडीने केजरीवाल यांना अटक केली होती.
आज सुनावणीवेळी न्यायालयाने ‘ईडी’ला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले . याचिकाकर्त्याच्या अधिकारक्षेत्रावर भाष्य केलेले नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यावेळी ईडीने केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी केली. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणी २८ मार्च रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केली होती.
मागील सुनावणीवेळी केजरीवालांनी केला होता युक्तीवाद
२८ मार्च रोजी झालेल्या सुनावणीवेळी अरविंद केजरीवाल यांनी स्वत: युक्तीवाद केला होता. ते म्हणाले होते की, हे प्रकरण दोन वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. सीबीआयने ऑगस्ट २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ECIR फाइल तयार झाली. मला कोणी अटक केली? कोणत्याही न्यायालयाने मला दोषी ठरवले नाही किंवा माझ्यावर आरोपही केलेले नाहीत. आम आदमी पार्टीला उद्ध्वस्त करणे हाच अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) मूळ हेतू होता. मद्य धोरण प्रकरणी मला ‘सापळ्यात’ अडकवणे ईडीचे एकमेव ध्येय आहे,’ असा आरोपही त्यांनी केला होता.
कोणत्याही कोर्टाने मला दोषी सिद्ध केले नाही. सीबीआयने 31,000 पानांची आणि ईडीने 25,000 पानांची याचिका दाखल केली आहे. तुम्ही ते एकत्र वाचले तरी, मला अटक करण्याचे कारणच नव्हते. कारण जर 100 कोटी रुपयांचा दारू घोटाळा झाला असेल तर तो पैसा कुठे आहे? असा सवाल करत ईडीच्या तपासानंतर खरा घोटाळा सुरू झाला, असा दावाही त्यांनी केला होता.




