उत्तर प्रदेश :- काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर जुन्या मुस्लीम लीगच्या विचारसरणीचीच छाप दिसते आहे अशी टोका पंतप्रधान मोदींनी केली आहे. विरोधी पक्ष आजच्या भारताच्या आशा आणि आकांक्षांपासून तुटलेला आहे आणि त्यांचा जाहीरनामा त्यांची विचारसरणी प्रतिबिंबित करतो असे ते म्हणाले, ते म्हणाले की जाहीरनाम्याच्या उर्वरीत भागावर डाव्यांचे वर्चस्व दिसते आहे.
सहारनपुर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी काँग्रेस दशकांपूर्वी संपली असे देशातील लोकांना वाटते. ते म्हणाले की, काल काँग्रेसनं आपला जाहीरनामा ज्या प्रकारे प्रसिद्ध केला, त्यावरून हे सिद्ध झालं की, आजची काँग्रेस आजच्या भारताच्या आकांक्षा आणि अपेक्षांपासून दूर आहे. अशी कांग्रेस भारताला २१व्या शतकात पुढे नेऊ शकत नाही.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता आणि महात्मा गांधींसह अनेक दिग्गज कांग्रेसशी संबंधित होते. आज देश एका आवाजात बोलतोय की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी जी काँग्रेस लढली, ती दहा वर्षापूर्वीच संपली आहे आज उरलेल्या काँग्रेसकडे ना देशहिताची पोरणे आहेत ना देशाच्या प्रगतीची दृष्टी, असे ते म्हणाले. मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर या दोन्ही पक्षांमधील युतीबाबत जोरदार हल्लाबोल केला. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत या दोघांची आघाडी अपयशी ठरली होती. आणि आता दो लड़कों की फ्लॉप फिल्म पुन्हा प्रदर्शित झाली आहे. इंडिया आघाडी ही कमिशनच्या मिशनवर आहे, असा आरोपही त्यांनी केला, तसेच काँग्रेसला त्यांच्या बालेकिल्ल्यांमधूनही उमेदवार शोधणे कठीण जात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.




