

कोल्हापूर : सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना येथे हजसाठी येणाऱ्या यात्रेकरूंना कडाक्याच्या उन्हाचा फटका बसलाय. सौदी अरेबियाच्या सरकारी टीव्हीनं सांगितलंय की, मक्कामधील मशिदीचं तापमान सोमवारी 51.8 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. त्याचवेळी, उष्णतेमुळं आतापर्यंत 35 पाकिस्तानी नागरिकांसह 900 हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील ३१९ हज यात्रेकरून राज्य आणि भारत या दोन्ही समितीच्या माध्यमातून पोहोचले आहेत. तसेच खासगी टूर कंपनीकडून १२५ हज यात्रेसाठी गेले आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे सौदीमध्ये पन्नास अंश डिग्री सेल्सिअसवर तापमान पोहोचले आहे. मक्का येथून सर्वजण ‘मीना’ शहरात पोहोचले आहेत. तेथील ‘आराफत’ मैदानावर त्यांची तंबूमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे.
‘जमरात’ येथे तीन सैतानांचे स्तंभ आहेत. त्यांना प्रत्येकी सात दगड मारण्याची प्रथा आहे. तेथे सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील यात्रेकरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील चौघेजण हरवले होते; मात्र त्यांच्याकडील बॅण्डवरून त्यांना पुन्हा त्यांच्या गटात सोडले आहे. या बॅण्डमध्ये संबंधित व्यक्तीचे नाव, कोठून आली, कोठे जाणार आहे, गाव, जिल्हा, राज्य, देश, सौदीत त्यांचे राहण्याचे ठिकाण याची माहिती असते.
