नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर अटीतटीच्या ठरलेल्या राजधानी दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानोत्तर चाचणीत दिल्लीत सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ‘आप’साठी ही धोक्याची घंटा समजली जातेय. गेल्या काही वर्षात आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांवर अनेकविध आरोप करून सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आला. याच काळात तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगवास भोगावा लागला. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. यातच त्यांना त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे २०२५ ची विधानसभा निवडणूक ‘आप’साठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. दरम्यान, आज सकाळी आठ वाजल्यापासून दिल्लीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, लोकसभेसाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीतील आप आणि काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. परिणामी दिल्लीत तिहेरी लढत पाहायला मिळाली. यामुळे मतविभाजनाचा फटका बसण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. २०१५ आणि २०२० च्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने बहुमतासह दिल्लीचे तख्त राखले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपासह काँग्रेसने सत्ताधाऱ्यांपुढे मोठं आव्हान उभं केलं. राजधानीतील गेल्या दोन निवडणुकांमध्ये ‘आप’ने काही जागांवर कमी मताधिक्याच्या फरकाने विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीतही याच जागा सत्ताधाऱ्यांसाठी यशाची गुरुकिल्ली ठरू शकतात. दरम्यान, नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल आणि पर्वेश सिंग यांच्यात कडवी झुंज सुरू आहे. दोघेही २०० च्या फरकाने मागे-पुढे आहेत.

एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात?

तीन मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपला दोनतृतीयांशपेक्षाही जास्त जागा म्हणजे ५०-६० जागा मिळू शकतील असे भाकीत केले आहे. दोन चाचण्यांचा अपवाद वगळता इतर अंदाजांनी भाजप बहुमताचा ३६ चा आकडा सहज पार करेल असे सुचित केले आहे. ८ चाचण्यांनी भाजपला ३५ ते ४९ जागा मिळू शकतील असे मानले आहे. ‘पीपल्स पल्स’ संस्थेच्या अंदाजामध्ये भाजपला प्रचंड झुकते माप मिळाले असून केंद्रातील सत्ताधारी पक्षाला ७० जागांपैकी तब्बल ५१ ते ६० जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.