
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला युरोपातून भारतात प्रत्यार्पण करणे, ही अतिशय कठीण बाब असल्याची प्रतिक्रिया ‘सीबीआय’चे माजी संचालक ए. पी. सिंह यांनी व्यक्त केली आहे. याआधी युरोपमधून भारतात २० वर्षांपूर्वी अबू सालेमचे प्रत्यार्पण करण्यात आले होते.
‘भारतीय अधिकाऱ्यांसमोर आता ठोस पुरावे सादर करण्याची जबाबदारी असून, बेल्जियममधील न्यायालयानेही भारतातील तुरुंगातील स्थिती आणि सुनावणीच्या योग्य प्रक्रियेवर अनुकूलता दर्शविण्याची गरज आहे. भारत सरकारच्या विनंतीनंतर चोक्सीला अटक करण्यात आली. आता पीएनबी घोटाळ्यातील ठोस पुरावे देण्याची गरज आहे. कायदेशीर प्रक्रियेला वेळ लागेल. चोक्सीच्या वैद्याकीय स्थितीबाबत व देशातील तुरुंगातील स्थितीबाबत सकारात्मक दृष्टिकोन पटवून द्यावा लागेल,’ असे ते म्हणाले.
अंमलबजावणी संचालनालयाचे माजी संचालक कर्नालसिंग यांनी चोक्सीला भारतात परत आणण्यात तपास संस्था यशस्वी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. चोक्सीविरोधात भक्कम पुरावा असल्याने ही बाब शक्य आहे, असे ते म्हणाले.




