नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतर आता भारतीय संरक्षण दलांसाठी आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. फ्रान्सचे राफेल हे लढाऊ विमानाची निर्मिती आता भारतातच केली जाणार आहे. फ्रान्सच्या बाहेर राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज (मुख्य ढाचा) तयार करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. यासाठी डसॉल्ट एव्हिएशन आणि भारतातील टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड (TASL) यांच्यात करार झाले आहेत.
चार उत्पादन हस्तांतरण करारांनंतर हैदराबादमध्ये एक विशेष उत्पादन केंद्र उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे केवळ भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना मिळणार नाही, तर देशाची संरक्षण स्वयंपूर्णतेकडे वाटचालही अधिक वेगाने होणार आहे.
Fuselage (फ्युझलाज) म्हणजे काय?
Fuselage म्हणजे विमानाचा मुख्य ढाचा किंवा शरीर होय. सोप्या भाषेत सांगायचे तर फ्युझलाज म्हणजे विमानाचा तो भाग ज्यामध्ये पायलट, प्रवासी किंवा उपकरणे असतात. यालाच विमानाची मुख्य फ्रेम किंवा बॉडी म्हणता येईल. Wings (पंख), Cockpit (कॉकपिट), Tail (शेपूट), इंजिन्स हे विमानाचे इतर विभाग आहेत.
राफेलचा फ्युझलाज तयार करणे म्हणजे त्या संपूर्ण विमानाच्या बांधणीतील सर्वात मोठा आणि तांत्रिक दृष्ट्या महत्त्वाचा भाग भारतात तयार होणार आहे, हे मोठे यश आहे. ही केवळ संरक्षण उत्पादनक्षेत्रातील प्रगतीच नव्हे तर भारत-फ्रान्स संबंधातील दृढ विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे.
आंतरराष्ट्रीय पुरवठाही करणार
डसॉल्ट एव्हिएशन (Dassault Aviation) व टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड (TASL) यांनी चार उत्पादन हस्तांतरण करारांवर स्वाक्षऱ्या करत भारतात राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज (विमानाचे मुख्य ढाचे) तयार करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
या करारानुसार भारतात, विशेषतः हैदराबादमध्ये, एक स्वतंत्र उत्पादन सुविधा स्थापन होणार आहे आणि ती केवळ भारतासाठीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मागणीसाठीही फ्युझलाज पुरवणार आहे. ही बाब विशेषत्वाने महत्त्वाची ठरते कारण ही फ्रान्सबाहेरची पहिली राफेल फ्युझलाज उत्पादन सुविधा आहे. या प्रकल्पामुळे भारताच्या ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला मोठा चालना मिळणार आहे.